भारताच्या परराष्ट्र खात्यातील माजी अधिकारी आणि माजी खासदार सय्यद शहाबुद्दीन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. बाबरी मस्जिद प्रकरणातील ते महत्त्वाचे पक्षकार होते. शहाबानो प्रकरणात त्यांनी न्यायालयात ठामपणे मुस्लिमांची बाजू मांडली होती.

सय्यद शहाबुद्दीन यांचा जन्म १९३५ मध्ये झारखंडमधील रांचीमध्ये झाला होता. शिक्षणानंतर ते भारतीय परराष्ट्र सेवेत काम करत होते. अनेक देशांमध्ये त्यांनी भारताचे उच्चायुक्त म्हणून कामही केले. परराष्ट्र खात्यात काम केल्यावर ते राजकारणात आले. १९७९ – १९९६ या कालावधीत ते तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. बाबरी मस्जिद पाडल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला होता. या प्रकरणात ते पक्षकार होते. तसेच बाबरी कृती समितीचे अध्यक्षपदीही त्यांनी काम केले होते. शहाबानो या गाजलेल्या प्रकरणात त्यांनी ठामपणे मुस्लिमांची बाजू मांडली होती. १९८९ मध्ये शहाबुद्दीन यांनी इन्साफ पार्टी या राजकीय पक्षाची स्थापनाही केली होती. २००४ आणि २००७ मध्ये ऑल इंडिया मुस्लिम मजलिस- ए -मुशावरतचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय अनेक मुस्लिम संघटनांमध्येही ते सक्रीय होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणापासून लांबच होते.

गेल्या काही वर्षांपासून शहाबुद्दीन यांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले होते. १८ फेब्रुवारीरोजी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी पहाटे ग्रेटर नोएडामधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.