गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा फॉरवर्ड पार्टीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. पक्ष नेतृत्वाने त्यांचे राजीनामे घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सावंत यांनी दिली. विजय सरदेसाई, विनोद पालेकर, जयेश साळगावकर आणि एका अपक्ष आमदाराचा यामध्ये समावेश आहे.

विजय सरदेसाई, विनोद पालेकर, जयेश साळगावकर आणि एका अपक्ष आमदाराला मी राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यांच्या जागी चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याची माहिती सावंत यांनी एएनआयशी बोलताना दिली. नुकतेच दहा आमदारांनी भाजपामध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर गोव्यातील राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना बहुमत मिळाले नव्हते. तसेच निवडणुकांमध्ये भाजपाला 17 जागांवर विजय मिळाला होता. परंतु 10 जणांचा एक गट भाजपात विलिन झाल्यानंतर भाजपाचे संख्याबळ वाढून आता 27 झाले आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तीन आमदारांनी यापूर्वीच भाजपाला आपले समर्थन दिले होते. दरम्यान, आता काँग्रेसकडे केवळ 5 आमदार राहिले आहेत. तसेच भाजपाकडे आता बहुमत असल्याने त्यांना अन्य कोणाच्याही समर्थनाची गरज भासणार नाही.