दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी एका मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व खून प्रकरणी बीबीसीने तयार केलेल्या ‘स्टोरिव्हिले- इंडियाज डॉटर’ या वृत्तपटावर बंदी घातल्याचा निर्णय  अंगलट येणारा आहे, अशी बंदी घातल्याने महिला हक्कांवर खुली चर्चाच होणार नाही, ते दडपून टाकण्याचा हा प्रकार असून त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे, असे मत पेन अमेरिकन सेंटरने व्यक्त केले आहे.
भारत सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आणताना या वृत्तपटावर बंदी घातली आहे. आता त्यामुळे या वृत्तपटाची चर्चा जागतिक पातळीवर सुरू झाली आहे व अधिक गुंतागुंतीचे प्रश्न त्यातून निर्माण झाले आहेत, असे पेन अमेरिकन सेंटरच्या कार्यकारी संचालक सुझान नोसेल यांनी सांगितले.
नोसेल यांनी म्हटले आहे की, या वृत्तपटाचे फायदे लक्षात घेतले नाहीत. त्यातील आशय अधिक संकुचित करून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. खरेतर लोकांनी हा वृत्तपट पाहून त्यांचे मत ठरवावे व तसे करणेच जास्त योग्य होते. जर लोक त्या वृत्तपटाच्या आशयाशी सहमत नसतील तर त्यांनी त्याचा निषेध केला असता, त्यासाठी त्यावर बंदी घालण्याची गरज नव्हती.
यूटय़ूब व इतर माध्यमांनी हा वृत्तपट लोकांना उपलब्ध करून द्यावा व न्यायालयाने जी अकारण बंदी घातली आहे त्याला आव्हान द्यावे, असे पेन अमेरिकन सेंटरने म्हटले आहे. देशातील कायद्याशी विसंगत असा आदेश असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा न्यायालयाने सन्मान करायला हवा होता. ब्रिटिश निर्मात्या लेस्ली उदविन यांनी हा वृत्तपट तयार केला असून त्यामुळे भारतात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. या माहितीपटात मुकेश सिंग या गुन्हेगाराची मुलाखत असून ज्या बसमध्ये या मुलीवर बलात्कार झाला त्या बसचा तो चालक होता.
हा वृत्तपट ब्रिटनमध्ये रविवारी महिलादिनानिमित्त दाखवला जाणार होता, पण आता तो बुधवारी रात्री दाखवला जाणार आहे. भारत सरकारने बीबीसीला हा वृत्तपट दाखवण्यास मनाई केली होती व यूटय़ूबनेही तो दाखवू नये, असा आदेश दिला आहे.

न्यूयॉर्कमध्ये वृत्तपट दाखविणार
लेस्ली लुडविन यांच्या वृत्तपटाचे पहिले प्रदर्शन अमेरिकेत न्यूयॉर्क विद्यापीठाअंतर्गत असलेल्या बारूच महाविद्यालयात केले जाणार असून त्यावेळी ऑस्कर विजेत्या अभिनेत्री फ्रिडा पिंटो व मेरिल स्ट्रीप या उपस्थित राहणार आहेत. व्हायटल ग्लोबल पार्टनरशिप व प्लान इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थांनी त्याचे आयोजन केले आहे. वृत्तपट बनवणाऱ्या श्रीमती उदविन यांनी सांगितले की, डिसेंबर २०१२ मध्ये बलात्काराच्या घटनेनंतर जी निदर्शने झाली तो लैंगिक समतेचा अरब स्प्रिंग होता. व्हायटल व्हॉइसेसच्या अध्यक्षा सिंडी डायर यांनी सांगितले की, सगळ्यांनी हा वृत्तपट बघावा व अहिंसेची मागणी करावी, शक्तिशाली आशय असलेला वृत्तपट हा सांस्कृतिक बदलाचा एक मंच आहे. लोकांचे समज व दृष्टिकोन त्यातून समजतात. स्वित्र्झलड, नॉर्वे, कॅनडा या देशांमध्ये महिलादिनी हा वृत्तपट दाखवला जाणार आहे. ब्रिटनमध्ये तो चार मार्चला पहिल्यांदा दाखवण्यात आला आहे.