News Flash

विद्यापीठांना नक्षलवाद्यांचे अड्डे बनविण्याचे प्रयत्न

आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर होत असल्याची टीका

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचा आरोप; आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर होत असल्याची टीका

देशातील प्रमुख विद्यपीठांना नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या कारवायांचा अड्डा बनविणारे मूठभर बुद्धिजीवी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. देशाविरोधात, समाजाविरोधात काम करणाऱ्या अशा बुद्धिजीवींच्या मुसक्या आवळण्याची भूमिका केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मांडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी असेच विधान केले होते.

देशाविरोधात काम करणाऱ्या, देशविघातक शक्तींचे उदात्तीकरण करणाऱ्यांना बुद्धिजीवी कसे म्हणायचे? असा सवाल करून ते म्हणाले, ‘विद्यापीठात ठाण मांडून बसलेली ही कथित बुद्धिजीवी मंडळी आंबेडकरांच्या नावाचा, कार्याचा गैरवापर करीत आहेत. आंबेडकरांनी कधीही रक्तरंजित क्रांतीची भलावण केली नाही. याउलट त्यांचा भर शिक्षणावर होता, प्रगतीवर होता. ते पक्के लोकशाहीवादी होते, पण ही बुद्धिजीवी मंडळी आंबेडकरांच्या नावाने संघटना काढून लोकशाहीविरोधी कारवाया करीत आहेत. रक्तरंजित हिंसक कृत्यांचे उदात्तीकरण करीत आहेत. आता खरोखरच त्यांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या कारवायांची आमच्याकडे ठोस माहिती आहे.’

मध्यंतरी झालेल्या नक्षलग्रस्त भागांच्या मुख्यमंत्र्यांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी जंगलांमध्ये दडलेल्या नक्षलवाद्यांबरोबरच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यपीठ (जेएनयू), पुणे, हैदराबाद यासारख्या विद्यापीठांमध्ये ठाण मांडून बसलेल्या बुद्धिजीवी पाठीराख्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली होती. सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले, ‘आम्ही बेसावध राहिलो, पण तो आमच्यासाठी एक धडा आहे. आम्ही त्यातून खूप काही शिकलो. जंगलांमधील झाडांमागून नेणारी प्रत्येक गोळी आमच्यासाठी आव्हान आहे.’ आंध्र, तेलंगण, महाराष्ट्रासह छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशातील नक्षलवाद कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. मागील काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे. त्यांना रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस आणि जवानांची पथके असली तरी नक्षलवादी रक्तरंजित कारवाया करतच आहेत.

‘ते’ प्रकार अपवादात्मक’

हंसराज अहिर यांच्या भूमिकेबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ज्याअर्थी अहिर बोलत आहेत, त्याअर्थी त्यांच्याकडे पक्की माहिती असावी. त्यांचे म्हणणे खरे आहे. काही विद्यापीठांमध्ये नक्षलवादाचे उदात्तीकरण करणारे, त्यांना पाठिंबा देणारे काही घटक नक्की आहेत, पण ते हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच आहेत. म्हणून सरसकट विद्यापीठे नक्षलसमर्थकांचे अड्डे झाल्याचे म्हणता येणार नाही. याउलट या विद्यापीठांचा, त्यांच्या कामगिरींचा आम्हाला अभिमान आहे. जेएनयूला सर्वोच्च गुणवत्तेचा पुरस्कार मिळाला तो काही जणांनी दहशतवादी अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या म्हणून नव्हे, तर त्या विद्यापीठाने र्सवकष केलेल्या प्रगतीने, घेतलेल्या अनेक पेटंटमुळे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:23 am

Web Title: hansraj ahir prakash javadekar devendra fadnavis
Next Stories
1 पाकिस्तानच्या बेटकुळ्या
2 परिस्थिती कशी हाताळायची हे लष्करालाच ठरवू द्या: जेटली
3 इंडोनेशियातील जकार्तामध्ये बॉम्बस्फोट, दोन ठार
Just Now!
X