चीनचा प्रश्न हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले का? हा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. त्यावेळी ६९ टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे. तर १५ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. उर्वरित लोकांनी माहित नाही असं उत्तर दिलं आहे. देशाचा मूड काय आहे हे जाणून घेण्यासाठी कार्वी- इंडिया टुडेने एक सर्व्हे घेतला होता. या सर्वेक्षणानुसार लोकांनी मतं नोंदवली आहे. लॉकडाउनचा काळ असल्याने या प्रश्नासाठी १९ राज्यांमधील १२ हजारांपेक्षा जास्त लोकांशी फोनवरुन संपर्क साधण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या उत्तरांवरुन हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. Mood of The Nation 2020 या सर्वेक्षणात लोकांनी आपली मतं मांडली आहेत.

जून महिन्यात भारत आणि चीन या दोन देशांच्या सैनिकांमध्ये लडाख येथील गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर भारतात चीन विरोधातला रोष वाढला. या सगळ्या घडामोडींच्या नंतर लडाखमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान संघर्षात जखमी झालेल्या जवानांचीही भेट घेतली. तसेच त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचाही प्रयत्न केला.

चिनी अ‍ॅप व चिनी कंपन्यांना बंदी घालण्याचा निर्णय चीनच्या आक्रमक धोरणाविरोधात योग्य दृष्टीकोन आहे का?” असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ९१ टक्के भारतीयांनी हो असं उत्तर दिलं आहे. चिनी अॅपवर बंदी घालणं योग्य निर्णय आहे, असं भारतीयांनी म्हटलं. तर हा निर्णय चुकीचा असल्याचं ७ टक्के भारतीयांनी म्हटलं आहे. दोन टक्के भारतीयांनी यावर माहिती नाही असं उत्तर दिलं आहे.