इंधन दरवाढीतून किरकोळ दिलासा मिळत असतानाच आता अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहे. अनुदानित सिलिंडरचे दर सुमारे अडीच तर विना अनुदानित सिलिंडरचे दर ४७. ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. यातून दिलासा देण्यासाठी आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज किरकोळ कपात केली जात आहे. एकीकडे इंधन दरवाढीतून दिलासा मिळत असतानाच आता सिलिंडर महागले आहे. अनुदानित सिलिंडरचे दर अडीच रुपये तर विनाअनुदानित सिलिंडरचे दर ४७. ५० रुपयांनी महागले आहेत. मुंबई अनुदानित सिलिंडरचे दर ४९१. ३१ रुपये इतके असून विनाअनुदानित सिलिंडरचे दर ६७१. ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.. एक जूनपासून हे नवीन दर लागू झाले आहे.

एका वर्षांत एका कुटुंबाला अनुदान असलेले १२ सिलिंडर दिले जातात. वर्षांत १२ पेक्षा जास्त सिलिंडर झाले तर त्या व्यक्तीला बाजार मूल्यानुसार १३ वा सिलिंडर खरेदी करावा लागतो.

दरम्यान, इंधनाच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी किरकोळ कपात करण्यात आली. पेट्रोलचे दर ६ पैसे आणि डिझेलचे दर ५ पैशांनी कमी झाले. मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८६. १० रुपये तर डिझेलने लिटरमागे ७३. ६७ इतका दर गाठला.