जम्मू काश्मीरचे रहिवासी असलेले माजी आयएएस अधिकारी आणि ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ पक्षाचे सर्वेसर्वा असणाऱ्या शाह फैजल यांनी जमावबंदीमध्ये काश्मीरमधील परिस्थिती कशी आहे यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रविवारच्या मध्यरात्रीपासून जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. फैलज यांनी फेसबुक पोस्टमधून नेमकी जम्मू-काश्मीरमधील सध्या परिस्थिती कशी आहे याचे वर्णन केले आहे.

फैलज यांनी कलम ३७० संदर्भात राज्यात लागू करण्यात आलेल्या जमावबंदीमध्ये सामान्य जनजीवन कशापद्धतीने सुरु आहे याबद्दल फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. “काश्मीरला अप्रत्यक्षरित्या बंद पुकारण्यात आल्यासारखी परिस्थिती आहे. झीरो ब्रिगेडपासून विमानतळापर्यंत काही गाड्या येताना जाताना दिसतात. बाकी इतर परिसरामध्ये पूर्ण बंदसारखी परिस्थिती आहे. केवळ रुग्ण आणि जमाव बंदीच्या काळात विशेष सवलत देण्यात आलेल्या व्यक्तीच रस्त्यावर दिसत आहेत. ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन सारख्या नेत्यांशी संपर्क होऊ शकत नाही. इतर जिल्ह्यांमध्ये जमावबंदी जास्त कठोरपणे लागू करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधील ८० लाख लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. असं याआधी राज्यात कधीही झालं नाही”, असं फैजल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संपर्काचे माध्यमच नाही

“सध्या खाण्यापिण्याच्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत नाही. प्रशासनामधील माझ्या ओळखीच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना दिलेले सॅटेलाइट फोन सामान्य जनताही वापरु शकते. संपर्क साधण्याचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसून ज्यांच्याकडे डीश टिव्ही आहे ते लोक बातम्या पाहत आहेत. केबलची सेवा पूर्णपणे बंद आहे. बहुतांश लोकांना काय झाले आहे याची काहीच कल्पना नाही. काही तासांपूर्वीपर्यंत रेडिओ काम करत होता मात्र आता तो ही बंद झाला आहे. सर्वाधिक लोक दूरदर्शन पाहत आहेत. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनाही काश्मीरच्या अंतर्गत भागांमध्ये जाण्याची परवाणगी देण्यात आलेली नाही. गरोदर महिला मागील अनेक दिवसांपासून रुग्णालयामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळेच एलडी रुग्णालयामध्ये क्षमतेहून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. येथे काही लोकांनी मोफत खाणं वाटप केलं आहे,” असं फैजल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची मोठी हिंसा झालेली नाही असंही फैजल यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘रामबाग, नातिपोरा, डाऊन टाऊन, कुलगाम, अनंतनाग सारख्या परिसरामध्ये अगदी किरकोळ दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. मात्र यामध्ये कोणीही जखमी किंवा मरण पावलेले नाही,’ असं फैजल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.