माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपाला श्रीराम करत देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पक्षीय राजकारणाला सोडचिठ्ठी देत यशवंत सिन्हा भाजपातून बाहेर पडले आहे. देशासाठी राष्ट्रमंच स्थापन करण्याची घोषणा यशवंत सिन्हा यांनी केली. तसेच येत्या काळात कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही असेही त्यांनी जाहीर केले. देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विरोधकांना काहीही किंमत उरलेली नाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही त्यामुळे देशात लोकशाही असे वाटत नाही असाही टोला यशवंत सिन्हा यांनी लगावला आहे.

बिहारमधील पाटणा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मी आजपासून राजकारणातून संन्यास घेतो आहे. माझे भाजपासोबत असलेले सगळे नाते मी तोडून टाकतो आहे असेही यशवंत सिन्हा यांनी जाहीर केले. भाजपाच्या कारभाराबद्दल अर्थात मोदी सरकारवर याआधीही सिन्हा यांनी टीका केली आहे. नोटाबंदीचा निर्णय, जीएसटी यावरून त्यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर देत त्यांच्यावर ताशेरे झाडले आहे. आज अखेर आपली सगळी नाराजी बोलून दाखवत त्यांनी पक्षाला आणि पक्षीय राजकारणाला सोडचिठ्ठी दिली आहे.

२०१९ च्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना भाजपातून यशवंत सिन्हा यांनी बाहेर पडणे हा पक्षासाठी खूप मोठा झटका मानला जातो आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. मात्र मोदी सरकारच्या काळात त्यांनी आपली नाराजी वारंवार व्यक्त केली. त्यांना काही वेळा सत्तेतील मंत्र्यांनी प्रत्युत्तरे दिली. मात्र काही वेळा दुर्लक्ष केले. आता या सगळ्याला कंटाळून त्यांनी थेट पक्षाला रामराम केला आहे.

पाटणा येथील कार्यक्रमात आपली नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या सरकारने देशात अस्थिरता निर्माण केली आहे. जनतेच्या मनात या सरकारबाबत विश्वास उरलेला नाही. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारकडून वारंवार होतो आहे. संसदेचे कामकाज विरोधकांकडून बंद केले जाते असा आरोप सत्ताधारी करतात पण एकदाही विरोधकांशी या विषयावर चर्चा करत नाहीत असेही यशवंत सिन्हा यांनी सुनावले आहे.