ओदिशाच्या कटक जिल्ह्यातील तालाबस्ता गावात एक अत्यंत वेगळीच पण धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक माकड १६ दिवसांच्या नवजात बालकाला घेऊन फरार झाला आहे. घटनेच्या वेळी बालक झोपला होता अशी माहिती आहे. माकडाचा कसून शोध घेण्यात आला पण अद्याप चिमुकला किंवा माकड दोघांचाही शोध लागलेला नाही. मुलाचं अद्याप नामकरणही झालं नव्हतं.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्यावेळी चिमुकल्याचे पिता रामकृष्‍णा नायक हे चिमुकल्याजवळच झोपले होते. पत्नी सरोजिनी सकाळी लवकर उठून काही काम करत होती. सकाळी जवळपास ६ वाजता एक माकड घराचं कुंपण ओलांडून आला व मुलाला घेऊन पळाल्याचं तिने पाहिलं. पत्नीने आरडाओरडा केला पण तोपर्यंत माकड पळाला होता.

बालक मच्छरदानीमध्ये झोपला होता, माकडाने मच्छरदानीतूनच मुलाला पळवून नेल्याचं त्यांची नातेवाईक परमीलाने सांगितलं. बालकाचा जन्म वेळेआधी झाला होता, त्यामुळे तो कमजोर होता म्हणूनच तो माकड पळून नेत असताना रडला नाही असं सांगितलं जात आहे. कटकमध्ये उपचार करून गुरूवारीच त्याला घरी आणलं होतं.

घटनेनंतर जवळपास ५०० जणांच्या आणि वन अधिका-यांच्या मदतीने शोध अभियान राबवण्यात आलं, शक्य तेथे सर्व ठिकाणी शोध घेण्यात आला पण त्यांच्या हातात निराशा आली. शोध घेण्यासाठी आमचे लोकं परिसरातील जवळपास सर्वच झाडांवर चढले पण अजून काही शोध लागलेला नाही असं वन अधिकारी संग्राम केसरी यांनी सांगितलं. जर माकड जवळच्या चादंका-दामपारा अभयारण्यात शिरला असेल तर शोध घेणं खूप कठीण असल्याचं केसरी म्हणाले.