नेहमीच वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी विरोधकांना कावळे, माकडं आणि कोल्हे म्हटलं आहे. विरोधकांची मोदींबरोबर तुलना करताना त्यांनी मोदींना वाघ ठरवलं आहे. दोन महिन्यांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांना साप, कुत्रा आणि मांजर म्हटले होते. अनंत कुमार हेगडे यांनी अशा प्रकारचे विधान करुन आपल्याच पक्षाध्यक्षांचा कित्ता गिरवला आहे.

एकाबाजूला कावळे, माकडं आणि कोल्हे असून आता ते सर्व एकत्र आले आहेत. पण दुसऱ्याबाजूला वाघ आहे. कर्नाटकमध्ये विरोधक कसे एकत्र आले त्याचे त्यांनी उदहारण दिले. त्यांनी जनतेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाघाला म्हणजेच पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडून देण्याचे आवाहन केले.

अनंत कुमार हेगडे यांनी यापूर्वी सुद्धा अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. आज आपण प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसलो आहोत, याला काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही ७० वर्ष राज्य केले असते तर तुम्ही आज चांदीच्या खुर्च्यांवर बसला असता असे अनंत कुमार म्हणाले.

ज्यांना आपले आई-वडील माहित नाहीत ते स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात. त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना स्वत:चे कूळ नाही पण ते विचारवंत म्हणवतात असे अनंत कुमार म्हणाले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी संविधानाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मी संविधानाचा आदर करतो पण पुढच्या काही काळात त्यामध्ये बदल होईल असे हेगडे डिसेंबरमध्ये म्हणाले होते. याआधी सुद्धा अनंत कुमार हेगडे यांच्या अनेक विधानांवरुन वाद झाला आहे.