देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या २१ हजार ६०४ इतकी झाली आहे.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आठ लाखांच्या जवळ पोहचली आहे. गेल्या २४ तासांत वाढलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्ण सात लाख ९३ हजार ८०२ इतके झाले आहेत. दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चार ९५ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे.

दररोज २० हजारांच्या पुढे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण आधिक आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

लस लवकर विकसित होणे गरजेचे – आयसीएमआर

भारत बायोटेक आणि कॅडिला हेल्थ केअर या दोन कंपन्या लस विकसित करत आहेत. लसीच्या घातकपणाची चाचणी प्राण्यांवर घेण्यात आली आहे. आता मानवी चाचणीसाठी टप्पा १ व २ साठी या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. कुठल्या रुग्णालयांमध्ये मानवी चाचणी करायची हेही निश्चित करण्यात आले आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावर ते जाहीर केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) राजेश भूषण यांनी दिली.  भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने मानवी चाचणीसाठी रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रामागे लसीच्या मानवी चाचण्यांना गती दिली जावी एवढाच हेतू होता. काळाची गरज ओळखून लस लवकरात लवकर विकसित झाली पाहिजे. पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करून लस विकसित करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला तर त्याचा उपयोग होणार नाही. संशोधनाच्या मान्यताप्राप्त प्रक्रियेला बगल न देता वेगाने मानवी चाचण्या व्हाव्यात असा दृष्टिकोन असल्याचे ‘आयसीएमआर’च्या निवेदिता गुप्ता यांनी सांगितले.