देशात ऑनलाइन खरेदीला मिळणारी पसंती पाहता आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यान, पोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.

भारतीय पोस्ट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसी, फ्रिज, टिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते. सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती पोस्टातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच हे सामान पोस्टमॅनच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सरकारने सुरू केलेली ही सेवा असल्याने यामध्ये फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता नाकारण्यात येत आहे. तसेच सामान ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही पोस्टाचीच असणार आहे. वस्तू विकत घेताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे पैसे भरता येणार आहेत. तसेच ग्रहकांपर्यंत त्यांच्या वस्तू पोहोचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तसेच वस्तूमध्ये काही दोष आढळल्यास त्या परत करण्याचे ऑप्शनही देण्यात येणार आहे. याद्वारे पोस्टाची आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत मिळणार आहे. सरकारी एजन्सीकडून सामान खरेदी केल्यास 7 टक्के तर खासगी एजन्सीकडून सामान खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत पोस्ट खात्याला कमिशन देण्यात येणार आहे.