गेल्यावर्षभरात नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विचारले असता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही, असे आश्चर्यजनक उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथील तरूणाने माहिती अधिकारातंर्गत वर्षभरातील मोदी सरकारच्या २० महत्त्वपूर्ण उपलब्धींवियी पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा केली होती. तुम्हाला हवी असलेली माहिती सरकारच्या वेगवेगळ्या सार्वजनिक विभागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यातंर्गत तुमचा अर्ज दुसऱ्या एखाद्या सार्वजनिक विभागाकडे हस्तांतरित करता येणे शक्य नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने आपल्या उत्तरात म्हटले आहे. मोदी सरकारने २६ मे रोजी वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे गेल्यावर्षभरात सरकारच्या ठळक अशा २० यशस्वी कामांच्या यादीची मागणी या तरूणाने केली होती. विशेष म्हणजे सरकारने स्वत: आपल्या कामाची माहिती देण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली असताना पंतप्रधान कार्यालयाच्या या उत्तरामुळे अनेकजणांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.