INX Media Case: आयएनएक्स मीडिया प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कार्ती चिदंबरम यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. कार्ती चिदंबरम यांच्या ५४ कोटी रुपयांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून यात दिल्लीतील घर, उटी आणि कोडिकनालमधील आलिशान बंगला, यूकेतील घर आणि बार्सिलोनातील संपत्तीचा समावेश आहे.

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव व लोकसभेमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार कार्ती हे आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले आहे. या प्रकरणा त्यांना अटकही झाली होती. याच प्रकरणी आता ईडीने कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर आणि बँकेतील बचत ठेवींवर जप्तीची कारवाई केली आहे.

पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या ‘आयएनएक्स मीडिया’ या कंपनीला २००७मध्ये परकी गुंतवणुकीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी बेकायदा पद्धतीने मदत केल्याचा कार्ती यांच्यावर ठपका आहे. आपल्या वडिलांच्या तत्कालीन अर्थमंत्रिपदाचा व प्रभावाचा वापर करून कार्ती यांनी नियमबाह्य़ परकी गुंतवणूक केलेल्या ‘आयएनएक्स मीडिया’ची मदत केली आणि त्या बदल्यात स्वत:च्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा दावा सीबीआयने केला होता. या प्रकरणात ईडीनेही तपास सुरु केला होता.