बेंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या वैज्ञानिकांनी तीन प्रकारची श्वसनयंत्रे तयार केली असून त्याचे तंत्रज्ञान हस्तांतर लवकरच उद्योगांना केले जाणार आहे. करोना १९ साथीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना श्वसनयंत्रे लावण्याची वेळ आली होती.

इस्रोने तयार केलेली श्वसन यंत्रे आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाऊ शकतात. त्यातील एकाचे नामकरण ‘प्राण’ (प्रोग्रॅमेबल रेस्पिरेटरी असिस्टन्स फॉर दी नीडी एड) असे करण्यात आले आहे. दुसऱ्या यंत्राचे नाव ‘अंबू’ म्हणजे (आर्टिफिशियल मॅन्युअर ब्रीदिंग) असे करण्यात आले आहे.  दोन्ही यंत्रे अत्याधुनिक असून त्यात दाब संवेदक, प्रवाह संवेदक व प्राणवायू संवेदक आहेत. पीप— म्हणजे पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशरचाही यात वापर करण्यात आला असून त्यात नियंत्रण झम्डपांचाही समावेश आहे. श्वसनयंत्राच्या मदतीने रुग्णाला आवश्यक तेवढाच प्राणवायू पुरवला जातो. प्राणवायूमिश्रित हवा रुग्णाच्या फुप्फुसात सोडली जाते. पण हे प्रमाण योग्य असावे लागते.

इस्रोने म्हटले आहे, की श्वसन यंत्राने दोन पद्धतींनी प्राणवायू देता येतो. त्यात सातत्यपूर्ण श्वसनाची व्यवस्थाही नियंत्रित पद्धतीने केली आहे. त्यासाठी अलगॉरिदमचा वापर केला असून जर काही धोका निर्माण झाला तर आपोआप सुरक्षा झडपा उघडून बॅरोट्रॉमा, अ‍ॅसफिक्सिया व अ‍ॅपनिया हे प्रकार टाळले जातात. दोन्ही प्राणवायू यंत्रे ही अतिदक्षता विभागात सुरक्षित पद्धतीने वापरली जाऊ शकतात. त्यात जीवाणू व विषाणू यांना दूर करणारी  हवेची गाळणी किंवा फिल्टर्स बसवलेले आहेत.

वायू नावाचे श्वसनयंत्रही इस्रोने तयार केले असून त्याचा वापर अतिदक्षता विभागात करता येतो. यातही रोगजंतू विरहित हवाच रुग्णाला दिली जाते.

उच्च दाब प्राणवायू यंत्रालाही ते जोडता येते.

देशात २४ तासांत १,००,६३६ रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत १,००,६३६ करोनाबाधितांची नोंद झाली असून, गेल्या ६१ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. याच वेळी करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १४,०१,६०९ पर्यंत घसरली आहे. याच कालावधीत २४२७ जणांचा करोनाने मृत्यू झाला, जो गेल्या ४५ दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे.  करोना मृत्यूंचा एकूण आकडा ३,४९,१८६ वर पोहचला आहे.  देशात आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या २,८९,०९,९७५  झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.