काँग्रेस पक्षासाठी सध्या संघर्षाची वेळ असून त्यासाठी सज्ज असल्याचा संदेश पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीत पक्षाला भोगाव्या लागलेल्या दारूण पराभवानंतर दिला आहे.
अमेठी मतदार संघातून विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी राहुल गांधी आज(बुधवार) अमेठीत दाखल झाले होते. त्यांच्यासोबत बहिण प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेससाठी सध्या उत्तरप्रदेशात सध्या चांगले दिवस नाहीत हे खरे आहे परंतु, रायबरेली आणि अमेठी मतदार संघातील जनतेने काँग्रेसवर आत्मविश्वास दर्शविला आहे त्यामुळे मतदारांचे आभार व्यक्त करतो आणि पक्षासाठी सध्या संघर्षाची वेळ असून या संघर्षासाठी आम्ही सज्ज आहोत. असेही ते पुढे म्हणाले.
तसेच जनमताविरोधात कोणतीही पावले उचलली गेली, तर काँग्रेस त्याविरोधात जोमाने लढा देईल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. संघर्षासाठी सज्ज रहा असे आवाहनही राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना यावेळी केल्याचे समजते. अमेठीच्या जनतेने आमच्या सन्मानाचे जतन केले त्याबद्दल आभारी असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अमेठीतील रणसंग्रामात राहुल गांधी यांना मिळालेल्या मतांच्या फरकावर लक्ष घालण्याची गरज असल्याचे व्यक्त केले असता, प्रियांका गांधी यांनी अमेठीतील प्रचार हाताळल्या असल्याने पुढील आठवड्यात त्या मतांतील फरकाची कारणे जाणून घेण्यासाठी पुन्हा अमेठीत येतील असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.