पोलिसांसमोरच ५० हल्लेखोरांचा उच्छाद, प्रत्यक्षदर्शीचा दावा   

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू)आवारात झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा  प्रत्यक्षदर्शी केला.

लोखंडी सळ्या, काठय़ा, हॉकी स्टिक घेतलेल्या आणि चेहऱ्याला कापड गुंडाळलेल्या ५०हून अधिक हल्लेखोरांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्राणघातक मारहाण केली. यावेळी काही पोलीस आवारात होते. मात्र, त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असे एका प्राध्यापकाने सांगितले.

जेएनयूच्या शिक्षक संघटनेने रविवारी आवारात संध्याकाळी सहाच्या सुमारास शांतता सभा आयोजित केली होती. जेएनयूमध्ये हिंसक घटना होऊ  नयेत याची दक्षता घेतली जावी, यासाठी ही सभा घेण्यात आली होती. सभा संपल्यानंतर तिथे जमलेल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला केला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

हा हल्ला कदाचित पूर्वनियोजित असू शकतो, असे जेएनयूमधील प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर पन्नासहून अधिक होते. त्यांना शांतता सभेची माहिती होती. या सभेआधीच हल्लेखोर जेएनयूच्या आवारातील दोन-तीन शिक्षकांच्या घरी येऊ न बसले होते. सभा संपताच हे हल्लेखोर या शिक्षकांच्या घरातून बाहेर पडले आणि त्यांनी दिसेल त्याला बेदम मारहाण केली. हे हल्लेखोर जेएनयूचे विद्यार्थी नव्हते. त्यांचा वावर प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा होता. जेएनयूच्या साबरमती धाब्यावर उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांनी लक्ष्य केले. त्यात अनेक विद्यार्थी जबर जखमी झाले. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष हिच्या डोक्यावर काठय़ांनी प्रहार करण्यात आले. काही हल्लेखोर विद्यार्थिनींच्या वसतिगृहात घुसले आणि त्यांनी विद्यार्थिनींवर हल्ला केला, असे प्रत्यक्षदर्शी प्राध्यापकाने सांगितले. विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण होत असताना पोलीस गप्प कसे बसले, असा सवाल प्रत्यक्षदर्शीनी केला. दोन ते तीन तास हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी जेएनयूचे सगळे दरवाजे बंद केले. त्यामुळे विद्यार्थी आत अडकले.

पोलिसांचे वर्तन संशयास्पद

जेएनयूच्या आवारात हल्लेखोरांचा उच्छाद सुरू असताना पोलिसांचे वर्तन संशयास्पद असल्याचे म्हटले जाते. जेएनयूच्या आवारात हल्लेखोरांना मोकाट सोडले गेल्याचेही सांगितले जात आहे. शिक्षकांना मारहाण झाली ही अफवा नसून प्रत्यक्ष घटना असल्याचे ट्विट या आवारातच राहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि शिक्षक संजय बारू यांनी केले. हिंसाचारावेळी जेएनयूचे कुलगुरू आवारात नव्हते. रात्री १०.२२ मिनिटांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने ट्विट करून पहिली प्रतिक्रिया दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. जेएनयूमधील घटना दुर्दैवी असून अराजक सहन केले जाणार नाही, असे त्यात म्हटले आहे.