न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. वेळेअभावी आजचा युक्तीवाद पूर्ण होऊ न शकल्याने सुनावणीही अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे या याचिकांवर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर न्या. दुष्यंत दवे यांनी लोया यांचा मृत्यूवर संशय व्यक्त करीत खंडपीठाकडे या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.


न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणावरील याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. सन २०१४ मध्ये न्या. लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

जिल्हा न्यायालयाचे न्या. लोया यांच्या मृत्यूनंतर माध्यामांमध्ये झळकलेल्या बातम्या पाहता या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र, केवळ बातम्यांच्या आधारे आपण अशा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही, असे यापूर्वी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने सोमवारी म्हटले होते.

खंडपीठाने म्हटले होते की, या संपूर्ण प्रकरणात संबंधीत कागदपत्रे आणि रेकॉर्ड निष्पक्षतेने पाहवे लागणार आहेत. खूपच सुक्ष्मपणे आणि निष्पक्षपणे या प्रकरणाकडे पाहिले जाणार आहे. यासंदर्भातील पक्षकारांना त्यांच्याजवळ उपलब्ध असणारे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असा विश्वास खंडपीठाने दिला होता.

२०१४ मध्ये न्या. लोया हे सोहराबुद्दीन शेख चकमकप्रकरणाची सुनावणी करीत होते. याची सुनावणी सुरु असातानाच लोया यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुख्य आरोपी होते. न्या. लोया यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या न्यायाधीशांसमोर झालेल्या सुनावणीत अमित शहा यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.