भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव असतानाच भारताचे पाकिस्तानने अटक केलेले माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाहीर  सुनावणी होत असून, एकूण चार दिवस ही सुनावणी चालणार आहे. जाधव हे नौदलाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

लष्करी न्यायालयाने फार्स करून जाधव यांना हेरगिरीच्या कथित प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. नंतर भारताने ८ मे २०१७  रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात १९६३ च्या व्हिएन्ना करारातील दूतावास संपर्क सुविधेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्दय़ावर दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणी द हेग येथे १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी आहे.  पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ठार झाल्याच्या घटनेनंतर या सुनावणीला आणखी महत्त्व आले आहे. भारताने शुक्रवारी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून दहशतवादी हल्ल्याबाबत निषेध खलिता दिला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानी वस्तूंवरचे आयात शुल्क २०० टक्के करून तसेच व्यापारानुकूल देशाचा दर्जा (एमएफएन) काढून घेऊन पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे भारत सरकारच्या वतीने जाधव यांची बाजू मांडणार आहेत.