देशभरामध्ये गाजत असलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणजे ‘एनआरसी’वरुन कॉमेडियन कुणाल कामराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. कुणालने ट्विटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींची तुलना थेट जर्मनीचा हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलरशी केली आहे. तर हिटलरचा प्रमुख लष्करी अधिकारी अमित शाह असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

काय पोस्ट केलं आहे कुणालने?

सध्या देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) यावरुन ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर कुणालने देशातील नेतृत्व हिटंलरप्रमाणे काम करत असल्याचा टोला अप्रत्यक्षपणे लगावला आहे. केवळ रडणारे इमोन्जी कॅप्शनमध्ये पोस्ट करत कुणालने हिटलरच्या जिवनावर आधारित डाऊनफॉल (२००४) या इंग्रजी चित्रपटातील एका मिनिटांचा डब केलेला व्हिडिओ ट्विट केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

इंटरनेटवर ‘हिटलर्स रॅण्ट’ म्हणजेच हिटलरची आरडाओरड या नावाने लोकप्रिय असलेला हा व्हिडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भाषणातील संवाद डब केले आहेत. हे संवाद एनआरसी कायद्याबद्दलचे आहेत. व्हिडिओमध्ये हिटलर ओरडताना दाखण्यात आला आहे. त्यावेळी त्याच्या तोंडी मोदींच्या आवाजातील वाक्य दिली आहेत. “एनआरसीबद्दल काही झालं आहे का? खोटी माहिती दिली जात आहे. माझी सरकार आल्यानंतर २०१४ पासून आजपर्यंत मी १२० कोटी भारतीयांना सांगू इच्छितो की कधीही एनआरसी शब्दावर कुठेच चर्चा झालेली नाही,” असं हिटलर मोदींच्या आवाजात आरडाओरड करत बोलत असल्याचे या व्हिडिओत दिसते.

तसेच या डब व्हिडिओमध्ये अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेमधील क्रोनोलॉजी समझिये हे गाजलेलं वक्तव्य हिटलरच्या अधिकाऱ्याच्या तोंडी दाखवण्यात आलं आहे. “आप क्रोनोलॉजी समज लिजिये पहिले सीएबी येणार आहे. सीएबी आल्यानंतर एनआरसी येणार आणि एनआरसी येणार. एनआरसी केवळ बंगालसाठी नाही येणार तर संपूर्ण देशासाठी येईल,” असं हा अधिकारी अमित शाह यांच्या आवाजत म्हणता दिसतो. व्हिडिओच्या शेवटी हिटलर मोदींच्या आवाजात लष्करी अधिकारी म्हणजेच अमित शाह यांनी सांगितलेली माहिती खोटी असल्याचे सांगताना, ‘हे खोटं आहे हे खोटं आहे हे खोटं आहे’ असं ओरडताना दिसतो.

विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न

या व्हिडिओच्या माध्यमातून कुणालने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्त्यांमध्ये एकाच विषयावर दोन वेगळी मते दिसून येत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी एनआरसीबद्दल कधी चर्चाच झालेली नसल्याचे सांगितले आहे तर दुसरीकडे त्यांचे सहकारी शाह हे एनआरसी देशभरात लागू होणार असल्याचे सांगताना या व्हिडिओ पहायला मिळते.

हे आहे खरे दृष्य

मोदींची तुलना हिटलरशी करणाऱ्या या व्हिडिओला काही तासांमध्ये साडेतीन हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं असून ११ हजारहून अधिक जणांनी हे ट्विट लाईक केलं आहे.