मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याच्या जिवाला धोका असल्याचे लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरने निदर्शनास आणून दिल्याने लख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने दिली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव लख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत दहशतवादविरोधी न्यायालयाने दिली असल्याचे लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सुनावणीनंतर सांगितले.
लख्वीच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिल्यानंतर न्यायालयाने लख्वीचा अर्ज स्वीकारला, असे अब्बासी म्हणाले. तालिबान आणि परदेशी गुप्तचर यंत्रणांकडून लख्वीच्या जिवाला धोका असल्याने त्याला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत देण्यात यावी, लख्वीची न्यायालयात आणताना अथवा न्यायालयातून परतताना हत्या होऊ शकते, असा अर्ज अब्बासी यांनी केला होता.
न्यायालयाने लख्वीला जामीन मंजूर केल्यापासून तो एकदाही सुनावणीला हजर राहिलेला नाही, तो अज्ञात स्थळी वास्तव्याला आहे. सदर खटल्याची सुनावणी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिले. मात्र ही मुदत संपुष्टात येऊनही सुनावणीला वेग आलेला नाही.