शहरात सुरू असलेल्या जयपूर कला प्रदर्शनामध्ये येऊन काही लोकांनी प्रदर्शनातील चित्रांची नासधूस केली आहे. कलेच्या नावाखाली अर्धनग्न चित्रांचे प्रदर्शन भरवणार का असा सवाल विचारत लाल सेना नावाच्या सदस्यांनी या चित्र प्रदर्शनामध्ये असलेल्या चित्रांची नासाडी केली असे वृत्त इंडिया टुडेनी दिले आहे.

या प्रकरणातील दोषींना ओळखण्यात पोलिसांनी यश आले आहे. लाल सेनेची अध्यक्ष हेमलता शर्मा या आयोजकांना दम भरीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लील चित्र प्रदर्शन का भरवता? असा प्रश्न त्यांनी आयोजकांना विचारला.

त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गॅलरीमध्ये तोडफोड केली आणि चित्रे फाडली.

या ठिकाणी तोडफोड करण्यामध्ये आणखी एका समुहाचा समावेश होता. राष्ट्रीय हिंदू एकता मंचने याठिकाणी येऊन धुडगूस घातला. याआधी राष्ट्रीय हिंदू एकता मंचाने राजू हिराणी यांच्या पीके चित्रपट प्रदर्शनावेळी गोंधळ घातला होता.

याआधी देखील असे अनेक प्रसंग झाले आहेत जेथे काही लोकांनी येऊन चित्र प्रदर्शन किंवा चित्रपट गृहांमध्ये येऊन नासधूस केली आहे.

१ मे १९९८ मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एम. एफ. हुसैन यांच्या घरी येऊन गोंधळ घातला होता. हुसैन यांनी देवी देवतांची नग्न चित्रे काढल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

अहमदाबाद येथे हरविट्ज गॅलरी येथे हुसैन-दोषी गुफा दालनात भरण्यात आलेल्या प्रदर्शनावेळी देखील १९९६ मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता. त्रिशूल आणि भगवे उपरणे घालून आलेल्या कार्यकर्त्यांनी दालनातील २८ पेंटिंग्सची नासाडी केली होती. या चित्रपट प्रदर्शनात हुसैन यांनी माधुरी दिक्षीत संकल्पनेवर काढलेली चित्रे होती. ती देखील या गोंधळात नष्ट झाली.

२००४ मध्ये सुरतमध्ये गार्डन गॅलरी ऑफ आर्ट्स अॅंड टेक्साटाइलमध्ये चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. तेथे देखील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता.

२००६ मध्ये चेन्नईमध्ये अप्पाराव गॅलरीमध्ये हुसैन यांचे भारत मातेचे चित्र लावण्यात आले होते. त्यावेळी त्यावर आक्षेप नोंदवत कार्यकर्त्यांनी आयोजकांना धमकावले होते. त्यानंतर हुसैन यांनी आपले चित्र प्रदर्शनातून काढून टाकले.