केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत. एकूण पुरवलेल्या लसमात्रांची संख्या २० कोटी २८ लाख ९ हजार २५० अशी आहे. १४ मे रोजी वाया गेलेली लस वगळता १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ७७२ लस मात्रा वापरण्यात आल्या आहेत. अजून १ कोटी ८४ लाख ४१ हजार ४७८ लस मात्रा राज्यांकडे शिल्लक आहेत. काही राज्यांकडे ऋण शिल्लक दाखवत असून पुरवलेल्या लशींपेक्षा वापर जास्त आहे. यातील काही लशी लष्करी दलांसाठी पुरवण्यात आल्या होत्या. पुढील तीन दिवसांत ५० लाख ९१ हजार ६४० लशीच्या मात्रा राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना दिल्या जाणार आहेत. चाचणी करा, संपर्क शोधा, उपचार करा व कोविड सुसंगत वर्तन ठेवा या मुद्दय़ांवर भर देण्यात येत असला तरी कोविड नियंत्रणात लसीकरण हा प्रमुख टप्पा आहे. केंद्र सरकारने देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली असून राज्ये व कें द्र शासित प्रदेशांना मोफत लस दिली जात आहे. मुक्त व वेगवान अशा पद्धतीने १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचे जाहीर केले. केंद्रीय औषध प्रयोगशाळेने प्रमाणित केलेल्या लशींपैकी पन्नास टक्के लशी या केंद्राने खरेदी केल्या आहेत. त्या मात्रा राज्यांना आधी मोफत उपलब्ध करण्यात येत होत्या.

स्पुटनिक लशीचा दुसरा साठा हैदराबादेत दाखल

हैदराबाद : रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीचा दुसरा साठा भारतात दाखल झाला असून १ मे रोजी पहिला साठा दाखल झाला होता. १३ मे रोजी कसौली येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेने या लशीची तपासणी करून हिरवा कंदील दिला आहे. या लशीचा पहिला डोस शुक्रवारी देण्यात आला होता. सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व सीरम इन्स्टिटयूटऑफ इंडियाची कोविशिल्ड या दोनच लशी सध्या वापरण्यात येत आहेत. रशियाचे राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी ट्विटरवर संदेश पाठवून स्पुटनिक व्ही लशीच्या दुसऱ्या साठय़ाचे छायाचित्रही प्रसारित केले आहे. हैदराबादमध्ये दुसरा साठा आज पोहोचला. त्यात साठ हजार मात्रा आहेत. रेड्डीज लॅबोरेटरीज या संस्थेला या लशीच्या आयातीचा परवाना मिळाला आहे. रशियन राजदूतांनी संदेशात म्हटले आहे,की रशियाच्या लशीचा  दुसरा साठा येथे दाखल झाला असून दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांचे हे  फलित आहे. स्पुटनिक लशीच्या उत्पादनासाठीही डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज कंपनीशी करार झाला असून १३ मे रोजी कसौली येथील औषध प्रयोगशाळेने या लशीस हिरवा कंदील दिला होता. रशियन राजदूतांनी म्हटले आहे,की २०२० च्या उत्तरार्धापासून या लशीचा जगात वापर सुरू आहे. रशियाच्या तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे नवीन कोविड विषाणू प्रकारांवरही लस प्रभावी आहे. स्पुटनिक ही रशियन— भारतीय लस असून त्याचे उत्पादन भारतात सुरू केले जाईल. वर्षांला ८५० दशलक्ष डोसची निर्मिती यात केली जाईल. एका मात्रेची ‘स्पुटनिक लाइट’ ही लसही भारतात लवकरच उपलब्ध केली जाईल असे रशियन राजदूतांचे म्हणणे आहे.  डॉ. रेड्डीज कंपनीने स्पुटनिक व्ही लस भारतीय  बाजारपेठेत आणली असून या लशीची किंमत एका मात्रेला ९९५ रुपये ४० पैसे आहे. मूळ किंमत ९४८ रुपये असून त्यावर पाच टक्के  वस्तू व सेवा कर लावण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू होईल तेव्हा या लशीची किंमत कमी होईल, असे  डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने म्हटले आहे.