अनलॉक २ ची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. दरम्यान मोदींच्या या भाषणावर आता विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रीयाही येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेर पोस्ट करत मोदींना टोला लगावला.

अवश्य वाचा – …ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा, मोदींच्या भाषणावर राहुल गांधींचा अप्रत्यक्ष टोला

यानंतर MIM पक्षाचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनीही मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचं होतं पण ते बोलले चण्यावर. एका अर्थाने हे सुद्धा गरजेचं होतं. कारण कोणताही विचार न करता लागू केलेल्या लॉकडाउनमुळे या देशातील अनेक गरिबांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागले होते, अशा शब्दांत ओवेसींनी मोदींवर टीका केली आहे.

यादरम्यान आपल्या भाषणात बकरी ईदचा उल्लेख न केल्यामुळेही ओवेसींनी मोदींवर टिकास्त्र सोडलं आहे. मोदींनी मंगळवारी केलेल्या भाषणात चीनचा उल्लेख टाळल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App बंद केल्यानंतर मोदी सरकारची भूमिका मांडतील अशी अनेकांना अपेक्षा होती, परंतू मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख टाळला. दरम्यान आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी, अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.