वॉल्ट डिस्नीच्या ‘मिनी माऊस’ या प्रसिद्ध कार्टून कॅरॅक्टरला ३० वर्षांहून अधिक काळपर्यंत आवाज देणाऱ्या ज्येष्ठ कलाकार रसी टेलर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे निधन झाले. वॉल्ट डिस्नी कंपनीने त्यांच्या निधनाचे वृत्त ट्विटरवर प्रसारित केले.

वॉल्ट डिस्नी कंपनीचे प्रमुख आणि सीईओ बॉब इगर यांनीही कंपनीच्या अधिकृत अकाउंटवर रसी यांना श्रद्धांजली वाहिली. ‘मिकी माऊस’ या प्रसिद्ध पात्राला आवाज देणारे कलाकार वेन ऑलवाइन यांच्या रसी या पत्नी होत्या.

३० वर्षांहून अधिक काळ मिनी व रसीने मिळून जगभरातील लोकांचे मनोरंजन केले. या भागीदारीमुळे मिनी या पात्राला जागतिक ओळख मिळाली. त्यांचे काम या पुढेही लोकांना प्रेरित करत राहील. त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या संवेदना आहेत, अशी भावना डिस्नी कंपनीचे प्रमुख बॉब इगर यांनी व्यक्त केली. रसी यांचा जन्म मॅसॅच्युसेट्स येथे ४ मे रोजी १९४४ रोजी झाला. १९८६ मध्ये ‘मिनी माऊस’ या पात्राला आवाज देण्यासाठी त्यांची २०० उमेदवारांमधून निवड झाली होती.