संतप्त नागरिकांनी एका बलात्काऱ्याला तुरुंगातून बाहेर काढून जिवे मारल्याची घटना घडल्यानंतर दिमापूरमधील जनजीवन हळूहळू सामान्य होत असले, तरी शहरात अजूनही प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.
शहरात प्रतिबंधात्मक आदेश कायम असून, प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयआरबीच्या ११, तर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३ तुकडय़ा तैनात केल्या असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अकितो सेमा यांनी सांगितले. रस्त्यांवर वाहने तुरळक प्रमाणात दिसत होती, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदच राहिली. दरम्यान, गुरुवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपीला ठेचून मारणाऱ्या व शहरात जाळपोळ करणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेचे पुरेसे व्हिडीओ चित्रीकरण झालेले असल्याने दोषींना पकडणे पोलिसांना कठीण जाणार नाही, असे सेमा म्हणाले.
दरम्यान, नागरिकांनी जिवे मारलेला बलात्काराचा आरोपी सैयद फरीद खान यांचा मृतदेह चुमुकेदिमा येथे त्याची पत्नी व लहान भाऊ यांच्या ताब्यात देण्यात आला. तेथून ती आसाममधील सिल्चर येथे नेण्यासाठी आसाम सरकारने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली.
नागालॅण्डमधील या घटनेचा तपास करावा आणि जमावातील लोकांना शिक्षा करावी, अशी मागणी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या भारत शाखेने केली आहे. राज्याच्या अधिकाऱ्यांनी कायद्याचे राज्य कायम ठेवले पाहिजे. महिलांविरुद्धच्या हिंसाचाराची प्रकरणे राज्याने तातडीने व परिणामकारकरीत्या हाताळावीत, परंतु लोकांनी स्वत:हून रानटीपणाने त्यांना प्रतिसाद देणे योग्य नाही, असे मत संघटनेचे भारतातील कार्यक्रम संचालक शेमीर बाबू यांनी म्हटले आहे.