भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यांचा भाजपाला फायदा होईल या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपले म्हणणे चुकीच्या अर्थाने घेण्यात आल्याचे येडियुरप्पा यांनी ट्विट करुन सांगितले आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत फायदा होईल असे मत येडियुरप्पांनी व्यक्त केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. यावरुन भाजपा आणि येडियुरप्पांवर टीका झाल्यानंतर येडियुरप्पांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. आपल्याला म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यापुर्वी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यासाठी फायदा होईल असं येडियुरप्पा म्हणाल्याचे वृत्त पीटीआयने दिले होते.  या वृत्तानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबरच सामान्यांनाही येडियुरप्पांवर टीकेची झोड उठवली.

ट्विटवरही हा विषयावरुन नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा झाल्यानंतर येडियुरप्पांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देणारे ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘माझ्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ घेण्यात आला. मी फक्त सध्या वारे भाजपाच्या दिशेने वाहत असल्याचे म्हटले. हे मी मागील अनेक महिन्यांपासून म्हणत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा कर्नाटकमध्ये २२ जागा जिंकेल हे मी याआधीही म्हटलं आहे.’

दरम्यान काल भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे विमान पडल्यानंतर येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. येडियुरप्पा यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेत्यामुळे पाकिस्तानला भारताने धडा शिकवला आहे. मागील चाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. ‘भारताचे ४२ जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रत्येक जवानाच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल असं मत व्यक्त केलं होतं. हवाई हल्ला करुन त्यांनी त्यांचे वचन पाळले. मी आजच (बुधवारी) सकाळी ऐकलं की भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचं विमान पडालं. यानंतर भारतीय लोक पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत करताना, ते निर्णय साजरे करताना दिसत आहेत. या हल्ल्यामुळे पक्षाला राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल,’ असं मत येडियुरप्पांनी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले. मात्र या वक्तव्यावरुन अनेक स्तरांमधून टीका झाल्यानंतर आता येडियुरप्पांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून आपण असे कोणतेही वक्तव्य आपण केलेले नाही असं म्हटलं आहे.