काँग्रेस महाअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या चिरपरिचित शैलीत कार्यकर्त्यांसह नेत्यांची मने जिंकली. त्यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्याला टाळ्या मिळत होत्या. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची माफी मागत ते म्हणाले, तुम्हाला ओळखायला मला १० वर्षे लागली. मी माफी मागतो. मी गंगेत स्नान केलं सर, तुमच्या चरणांवर डोकं ठेऊन… तुम्ही सरदार आहात आणि असरदारही आहात. जे तुमच्या मौनानं करून दाखवलं, ते भाजपाच्या गोंधळानेही होऊ शकलं नाही. ही बाब मला दहा वर्षांनंतर समजली, अशा शब्दांत सिद्धूंनी मनमोहनसिंग यांचे कौतुक केले.

काँग्रेसचा पराभव झाला असेल तर तो एखाद्या नेत्यामुळे झाला. तुमच्यामुळे (कार्यकर्ता) नाही. तुम्ही तर सिकंदर आहात. तुम्ही शेरों के शर बब्बर शेर आहात. कार्यकता कधी एक्स किंवा माजी नसतो, असे ते म्हणाले.

पक्षाच्या ८४ व्या महाअधिवेशनात आर्थिक प्रस्तावावर बोलताना बहुतांश वक्त्यांना ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पण सिद्धूंनी २० मिनिटेच भाषण केले. सिद्धूंच्या भाषणामुळे सभागृहात चैतन्य निर्माण झाले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर थेट निशाणा साधला आणि काँग्रेसमध्ये आपली ‘घरवापसी’ झाल्याचे ते म्हणाले.

सिद्धूंनी काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली. पुढच्यावर्षी लाल किल्ल्यावर राहुल गांधी झेंडावंदन करतील, असेही ते म्हणाले.