नोटाबंदीनंतर भारतात ई-पेमेंटचा वापर वाढला असून विविध स्तरावर त्याचा वापर होताना दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘रुपे’ नावाचे नवीन क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.
पहिल्या टप्प्यात संस्थेचा ५ बॅंकांबरोबर प्रायोगिक प्रकल्प चालू असून, येत्या काळात बस आणि मेट्रोसाठी कार्ड आणण्याचाही मानस आहे.

हे रुपे क्रेडिट कार्ड लवकरच सुरु होणार असून प्रायोगिक तत्त्वावर हे कार्ड सध्या ७२०० जणांना देण्यात आले असल्याचे एनपीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.पी.होता यांनी सांगितले.

पंजाब नॅशनल बॅंक, सेंट्रल बॅंक, आयडीबीआय बॅंक, आंध्र बॅंक आणि युनियन बॅंक या पाच बॅंकांबरोबर सध्या काम करणार आहे. यानंतर बस आणि मेट्रोचे भाडे ग्राहक कार्डाव्दारे भरु शकेल असे कार्डही बनविणार आहोत. या प्रकल्पाची सुरुवात बंगळूरुमधून होईल तसेच जूनपासून कोचिन आणि अहमदाबाद येथेही ही सेवा सुरु करण्यात येईल असे होता यांनी सांगितले.

भारतातील डिजिटल व्यवहारांबाबत बोलताना ते म्हणाले, एनपीसीआयने आतापर्यंत २.३० लाख बॅंक एटीएम चालू केली असून ३ कोटींहून अधिक पॉंईट ऑफ सेल मशीनच्या माध्यमातून कॅशलेस पेमेंट वाढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. येत्या काळात या संख्येत आणखी वाढ करु असेही ते म्हणाले.