काँग्रेसने दोन वर्षांच्या कालखंडानंतर आज (बुधवार) रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. परंतु, पक्षाने ज्या नेत्यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण पाठवले आहे. त्यापैकी काहीजण या पार्टीत सहभागी होणार नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या या इफ्तार पार्टीत माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांच्याशिवाय त्यांचे चिरंजीव आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सहभागी होणार नाहीत. या दोन्ही नेत्यांनी नेमके त्याचवेळी बंगळुरूत इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. दरम्यान जेडीएसचे महासचिव दानिश अली हे काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत पक्षाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिट पक्षाचे नेते डी. राजा यांनीही कोईमतूर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. तर तृणमूल काँग्रेसकडून खासदार दिनेश त्रिवेदीही पक्षाचे प्रतिनिधीत्व करतील.

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या हायकमांडने सुमारे सर्वच प्रमुख नेत्यांना इफ्तार पार्टीसाठी बोलावले आहे. जे पक्ष पूर्वी संपुआ सरकारमध्ये सहभागी होते. त्यांनाही इफ्तारचे निमंत्रण देणार असल्याचे बोलले जात होते. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, बसपा, सपा, राजद, डावी आघाडी आणि जेडीएसशिवाय काही इतर विरोधी पक्षातील नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हेही इफ्तार पार्टीत सहभागी होणार नसल्याचे समजते. आरजेडीनेही आजच इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. पक्षाचे प्रवक्ते मनोज झा म्हणाले की, आरजेडीच्या इफ्तार पार्टीचे पूर्वीच आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तेजस्वी यादव हे दिल्लीला जावू शकणार नाहीत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजकीय पक्षांशिवाय काही मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही इफ्तार पार्टीचे निमंत्रण देण्यात आले आहे. अनेक माध्यमसमूहांनी काँग्रेस अध्यक्षांकडून प्रणव मुखर्जी यांना देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. आशा आहे की, या निराधार चर्चांना आता विराम मिळेल, असे ट्विट रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे.