प्रभू श्री रामचंद्रांचे जन्मस्थान नेपाळमध्ये असल्याचा दावा करणारे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आता देशात भव्य राम मंदिर उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मागील महिन्यात ओली यांनी नेपाळमधील ठोरी येथील अयोध्यापुरीमध्ये भगवान श्री रामांचे जन्मस्थान असल्याचा दावा केला होता. प्रभू रामांची जन्मभूमी नेपाळमध्ये असल्याचा दावा ओली यांनी केला होता. नेपाळमध्ये उभारण्यात येणाऱ्या या मंदिराला अयोध्या धाम असं नाव देण्यात येणार आहे.

नेपाळ सरकारची वृत्तसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय समाचार समितीने दिलेल्या माहितीनुसार ओली यांनी फोन करुन ठोरी आणि माडी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना काठमांडूमध्ये बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. देशाची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेतल्यानंतर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्याचे निर्देश ओलींनी दिले आहेत.

पंतप्रधानांनी ठोरी येथील माडी नगरपालिकेचे नाव बदलून अयोध्यापुरी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरतील जमीन अधिग्रहण करण्यासंदर्भातही कारवाई सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. या जमिनीवर भव्य राम मंदिर बांधून त्यामध्ये प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मणाची मोठी मूर्ती स्थापन करण्याचा ओली यांचा मानस आहे.

सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान ओली दसऱ्याच्या काळात रामनवमीच्या मुहूर्तावर भूमिपूजन करणार आहेत. या भूमिपूजनानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरु करण्यात येईल. दोन वर्षांमध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर रामनवमीच्या मुहूर्तावरच मूर्तीचे अनावरण करण्यात येईल. नियोजित वेळापत्रकानुसार काम झाल्यास २०२२ साली हे मंदिर सर्व भाविकांसाठी सुरु करण्यात येणार आहे. मंदिराच्या उभारणीसाठी सरकार आर्थिक मदत करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते ओली?

“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य ओली यांनी १३ जुलै रोजी देशाला संबोधित करताना केलेल्या भाषणात केलं होतं. ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला होता. “राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतात असलेली अयोध्या खरीखुरी नाही”, असाही दावा ओली यांनी केला होता. “भारतातली अयोध्या खरी असेल तर तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो ?” असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचाही दावा ओली यांनी केलेला.