चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळण्यात आल्याचा भारतीय वर्तमानपत्राचा दावा इराणने फेटाळून लावला आहे. “चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पाबाबत इराणने भारतासोबत कुठल्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे भारताला या प्रकल्पातून वगळण्यात आल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे” असे इराणच्या बंदर आणि सागरी विभागाचे अधिकारी फरहाद मोंतासिर म्हणाले. अली जझीराने बुधवारी हे वृत्त दिले.

“चाबहार बंदर प्रकल्पात गुंतवणूक करण्यासंबंधी इराणने भारतासोबत दोन करार केले आहेत. यात एक बंदरातील मशिनरी, साहित्य आणि दुसरा भारत इथे १५० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार असा आहे” असे फरहाद मोंतसिर यांनी सांगितले. इराणी वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांचा इराण-भारत चाबहार प्रकल्पाशी काहीही संबंध नाहीय, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अमेरिकेने २०१८ साली निर्बंधांमधुन चाबहार बंदर प्रकल्पाला वगळले आहे. रणनितीक दृष्टीने भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. भारतात या प्रकल्पावरुन मोठा गदारोळ सुरु आहे.

भारतीय वर्तमानपत्राने काय म्हटलं आहे?
चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे. अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तसंच निधी मिळण्यास विलंब होत असल्याचं इराण सरकारने सांगितलं आहे. इराणने आता स्वत:च हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द हिंदू’ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?
इराणने भारताला चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे. यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली असून आपली ताकद आणि सन्मान गमावत असल्याचंही म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण आपली ताकद आणि सन्मान गमावत आहोत. भारत सरकारला काय करायचं याची काहीच कल्पना नाही”.