माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात आज दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्यानंतर रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी चिदंबरम अखेर तिहार तुरूंगातून बाहेर पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १०६ दिवसांनी चिदंबरम यांची सुटका झाली आहे. मी उद्या पत्रकारपरिषद घेणार आहे. १०६ दिवसानंतर मी बाहेर पडून मोकळा श्वास घेत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे, अशी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

चिदंबरम तिहार तुरूंगातून बाहेर आले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद, पी चिदंबरम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची उपस्थिती होती. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर पुत्र कार्तीसह पी चिदबंरम हे काँग्रेसच्या  हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहचले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर काँग्रेसकडून ‘अखेर सत्याचाच विजय झाला, सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया देण्यात आली होती. तर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी, पी. चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याबद्दल मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, निष्पक्ष सुनावणीत ते स्वतःला निर्दोष सिद्ध करतील, अशी  ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.