काश्मीरच्या निवडणुका शांततेत पार पडण्याचे श्रेय दहशतवाद्यांना देणारे मुफ्ती मोहम्मद सईद यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच, संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरू याच्या शरीराचे अवशेष परत द्यावेत, अशी मागणी सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रातील रालोआ सरकारला केली. या मुद्दय़ावर पुन्हा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
अफझल गुरूचे अवशेष परत आणण्याची आपली मागणी कायम असून, याबाबत दिलेल्या आश्वासनाचा पीडीपी जोमाने पाठपुरावा करेल, असे पक्षाच्या ८ आमदारांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अफझल गुरूला दिलेली फाशी ही न्यायाची थट्टा होती. त्याला क्रमवारी मोडून (आऊट ऑफ टर्न) फासावर लटकवताना घटनात्मक आवश्यकता आणि प्रक्रिया यांचे पालन करण्यात आले नाही, हे पीडीपीने कायम सांगितले आहे. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या यादीत २८व्या क्रमांकावर असलेल्या गुरूला फाशी देण्याचा आम्ही निषेध केला होता. त्याला दया दाखवण्याबाबत अपक्ष आमदार रशीद अहमद यांनी मांडलेला ठराव मंजूर करायला हवा होता, असेही  म्हटले आहे.
संसदेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अफझल गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. २०११ साली जम्मू- काश्मीरच्या विधानसभेत गुरूला दया दाखवण्याबाबतच्या ठरावावरून गदारोळ झाल्यामुळे हा ठराव मांडला जाऊ शकला नव्हता.
अफझल गुरूच्या शरीराचे अवशेष परत मागणाऱ्या निवेदनावर मोहम्मद खलील बंध, झहुर अहमद मीर, राजा मंझूर अहमद, मोहम्मद अब्बास वाणी, यावर दिलावर मीर, अ‍ॅड. मोहम्मद युसूफ व नूर मोहम्मद शेख या आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.