नवी दिल्ली : फायझर कंपनीच्या लशीला परवानगीबाबत भारत सरकारशी चर्चा चालू असून या कंपनीने परवाना प्रक्रियेची वेगाने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

कंपनीचे प्रमुख अल्बर्ट बोरला यांनी सोमवारी सांगितले, की आम्ही भारताला ५१० कोटी रुपयांची औषधे देणगी म्हणून देत आहोत. कोविड १९ रुग्णांवरील उपचारासाठी ही औषधे उपयोगी येतील. फायझर इंडियाने भारतातील कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इमेल संदेशात म्हटले आहे,की भारतातील कोविड १९ स्थितीमुळे आम्ही व्यथित आहोत. आमची सद्भावना तुमच्या पाठीशी आहे. तुमचे आप्तच नव्हे, तर भारतीय लोक यांच्या वेदनेत आम्ही सहभागी आहोत. बोरला म्हणाले, की सध्या तरी फायझरच्या अमेरिका, युरोप, आशिया येथील वितरण केंद्रांच्या मार्फत फायझरच्या औषधांची मदत भारताला पाठवण्यात येणार आहे.

फायझर ही औषधे देणगी म्हणून पाठवणार आहे. या औषधांची किंमत ७ कोटी अमेरिकी डॉलर्स आहे. आम्ही सरकार व स्वयंसेवी संस्था यांच्याशी सहकार्याने काम करीत आहोत. भारत सरकारला कोविड १९ विरोधातील लढाईत ज्या औषधांची गरज आहे ती औषधे आम्ही पाठवित आहोत. फायझर फाउंडेशनच्या माध्यमातून मानवतावादी संघटनांच्या सहकार्याने जीवरक्षक औषधे पाठवण्यात येणार आहेत.