केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हे सहसा वादामध्ये अडकलेले दिसत नाहीत, पण सध्या ते चर्चेत आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या ४ वर्षांच्या काळात रेल्वेची कामगिरी सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी एका पत्रकाराने रेल्वेच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भातील एक पत्र गोयल यांना दिलं.

ते पत्र पाहून गोयल थोडेसे हसले आणि त्यांनी त्या पत्रकाराला एक ऑफऱ दिली. त्यांनी पत्रकाराला चक्क एक दिवस रेल्वे मंत्री बनण्याची ऑफर दिली. नायक सिनेमाप्रमाणे एका दिवसासाठी तुम्ही माझी जागा घ्या आणि स्वतःचे नियम-कायदे लागू करा, असं पियुष गोयल त्या पत्रकाराला म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला एक मॉक इव्हेन्टही आयोजित करायला सांगितला.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकावरूनन टीका होत आहे. काही गाड्यांनी ५०-५० तास उशीरा धावून नवा विक्रम केलाय. राजधानी, दुरंतो यांसारख्या गाड्या वेळेवर धावण्यासाठी ओळखल्या जायच्या पण त्यांचंही वेळापत्रक कोलमडलेलं पाहायला मिळालं. रेल्वे मार्गांवर सुरू असलेली दुरूस्तीची कामं यासाठी जबाबदार असल्याचं रेल्वे बोर्डाने सांगितलं होतं. पण स्वतः गोयल यांनी एका बैठकीत कोलमडलेल्या वेळापत्रकासाठी दुरुस्तीच्या कामाचं कारण देणं म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्यासारखं असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सुनावलं होतं. जर गाड्या वेळेवर सोडल्या नाहीत तर पदोन्नती रोखली जाईल असा इशाराही त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिला.