लडाखमधील गलवाण खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसेदरम्यान शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या २० जवानांना आज पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच देशातील १५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. भारत चीन सीमेवरील परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र त्यापूर्वी करोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी शहीदांना दोन मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.

करोनाचा उद्रेक झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला आहे. आजच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीतर तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर (मुख्यमंत्री नसल्यानं सचिव वा वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होते), तेलंगणा, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींनी चर्चा केली. या बैठकीला सुरुवात करण्याआधी सर्वांनी चीनच्या सीमेवर मंगळवारी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्र्यांबरोबरच्या या बैठकीमध्ये मोदींनी चीनच्या सीमेवर झालेल्या चकमकीचा उल्लेखही केला. भारतीय जावानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं सांगतानाच त्यांनी भारताला शांतातच हवी असल्याचाही उल्लेख केला. मात्र त्याचवेळी त्यांनी वेळ आल्यास भारत उत्तर देण्यास सक्षम असल्याचे सांगत चीनला इशारा दिला आहे.

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत.