पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात आभारप्रदर्शक भाषण दिलं. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी करोनाविरोधातील लढाईपासून ते नवीन कृषी कायद्यांची आवश्यकता का आहे यासंदर्भात सविस्तर भाषण दिलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आम्ही नवीन कृषी कायदे आणल्याचं नमूद केलं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असून नवीन कायद्यांमुळे एक नवी पर्यायी व्यवस्था उभी राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. यावेळी मोदींनी कृषी क्षेत्रामध्ये नव्याने बदल करण्याची आताच गरज असल्याचेही सांगितले.
भाषाणाच्या सुरवातीपासूनच पंतप्रधानांनी कृषी कायद्यांसदर्भात बोलण्यास सुरुवात केली. यावेळी मोदींनी नवीन कृषी कायदे आल्यापासून देशामध्ये कुठेही कोणतीही कृषी बाजारसमिती बंद झाल्याचे किंवा एमएसपी रद्द झाल्याचे वृत्त नाही, असा उपरोधात्मक टोला विरोधकांना लगावला. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. आपला देश आकाराने खूप मोठा आहे. त्यामुळे या नवीन कायद्यांचा अनेक ठिकाणी फायदा होईल काही ठिकाणी म्हणावा तितकासा फायदा झाला नाही तरी पर्यायी व्यवस्था उभी राहील. ही पर्यायी व्यवस्था स्वीकारायची की नाही तो शेतकऱ्यांचा निर्णय असणार आहे. ही पर्यायी व्यवस्था लादली जाणार नाहीय, असंही मोदींनी भाषणामध्ये स्पष्ट केलं.
‘आधार’विरोधात कोण कोर्टात गेलेलं?, मोदींच्या प्रश्नावर काँग्रेस म्हणाली, ‘तुम्हीच CM असताना…’https://t.co/WRl2JHH3Pm
आधारकार्डच्या मुद्द्यावरुन लोकसभेमध्ये मोदी आणि काँग्रेस आमने-सामने#PMModi #Modi #aadhar #Congress #LokSabha #BJP
— LoksattaLive (@LoksattaLive) February 10, 2021
शेतकरी स्वत:चं भलं ते करु शकले असते तर ते त्यांनी कधीच केलं असतं. आपण दुसऱ्या हरीत क्रांतीबद्दलही बोललो आहोत. मात्र आता देशातील सर्व राजकारण्यांनी एकत्र येत या कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, असंही मोदींनी नव्या बदलांची आवश्यकता असल्याचं नमूद करताना सांगितलं. १९ व्या शतकामधील यंत्रणांप्रमाणे आपण २१ व्या शतकामध्ये कृषी क्षेत्राकडे पाहू शकत नाही असंही मोदी यावेळी म्हणाले.
काँग्रेसच्या खासदारांनी आरडाओरड करुन गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी हा आरडाओरड आणि गोंधळ शेतकऱ्यांपर्यंत सत्य पोहचू न देण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला. एवढ्या दिवस जी खोटी माहिती आणि भ्रम निर्माण केला आहे त्याचा फुगा फुटेल अशी भीती वाटत असल्याने हा गोंधळ घातला जात आहे, असा टोला मोदींनी काँग्रेस आणि विरोधीपक्षांना लगावला.
कृषी क्षेत्रातील नवीन बदलांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती करता येईल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. त्याप्रमाणे करोना कालावधीमध्येही कृषी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यात आल्याचं सांगत देशातील कष्टकरी शेतकऱ्याचं भलं व्हावं अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे, असंही मोदी म्हणाले.