पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक भाषण केलं. या भाषणामध्ये पंतप्रधानांनी सोमवारी दिलेल्या भाषणाप्रमाणे आजही करोनाविरोधातील लढ्यामध्ये भारतीयांनी दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य केलं. करोनाविरोधातील लढ्यामध्ये भारतातील १३० कोटी जनतेने एकत्रितपणे लढा दिल्याचे सांगत मोदींनी सर्व भारतीयांना करोनाविरोधातील लढ्याचे श्रेय दिलं. तसेच पुढे बोलताना मोदींनी करोना संकटाच्या काळामध्ये भारत आत्मनिर्भर झाल्याचे दिसून आल्याचं म्हटलं. देशामध्ये सरकारने अनेक गोरगरीबांना धान्य आणि पैसे पोहचवल्याचे सांगत मोदींनी यासाठी बँक खाती आणि आधारकार्डचा फायदा झाल्याचे नमूद केलं. त्याचवेळी मोदींनी आधारकार्डविरोधात न्यायालयामध्ये कोण गेलं होतं असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र काँग्रेसच्या खासदारांनीही याला उत्तर देताना ओरडून तुम्ही मुख्यमंत्री असतानाच आधारकार्डला विरोध केला होता असं सांगितलं.

जगभरातील अनेक देश करोना, लॉकडाउन, कर्फ्यूमुळे आपल्या तिजोरीत असणारा निधी आपल्या लोकांपर्यंत पोहचवू शकले नाहीत. मात्र भारतामध्ये करोना कालावधीमध्येही जवळजवळ ७५ कोटी भारतीयांना ८ महिन्याचे अन्नधान्य आणि राशन पोहचवण्यात आल्याचं मोदींनी नमूद केलं.

त्याचप्रमाणे भारत सरकारने जनधन, आधार आणि मोबाईलच्या माध्यमातून करोना कालावधीमध्ये दोन लाख कोटी रुपये गरजूंपर्यंत पोहचलव्याची माहितीही पंतप्रधान मोदींनी सभागृहामध्ये दिली.

हाच संदर्भ देत तयार केलेल्या यंत्रणांमुळे करोना कालावधीमध्ये बराच फायदा झाल्याचे नमूद केलं. आधारकार्डसारख्या गोष्टींचाही यामध्ये फायदा झाल्याचे मोदींनी सांगितलं मात्र पुढे बोलताना त्यांनी याच आधार कार्डविरोधात कोण न्यायालयामध्ये गेलेलं ठाऊक आहे देशाला, असा टोला काँग्रेसला लगावला. त्यावर काँग्रेसच्या खासदारांनी आरडाओरड सुरु केला. तसेच मोदींना तुम्ही मुख्यमंत्री असतानाच आधारला विरोध केला होता असं सांगितलं. यावर मोदींनी हसतच, आरडाओरड करुन काही क्षण मला विश्रांती दिल्याबद्दल आभार. या सदनामध्ये अज्ञानी असणं खूप मजेदार असतं, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं.