कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उडी घेतली असून त्यांची पहिली सभा म्हैसूर येथे झाली. आपल्या भाषणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकातील विद्यमान सिद्धरामय्या सरकारवर टीकास्त्र सोडले. संसदेत १५ मिनिटे बोलण्याची मुभा द्या, पंतप्रधान मोदींचे तोंड बंद करू असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याला मोदींनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले. काँग्रेस अध्यक्षांनी मला आव्हान दिले आहे की ते १५ मिनिटे बोलले तर मोदी बसूही शकणार नाहीत. पण ते १५ मिनिटे बोलणार हीच मोठी गोष्ट आहे. तुम्ही कागद न घेता १५ मिनिटांचे भाषण बोलून दाखवावे, असे आव्हानच त्यांनी दिले. तुम्हाला ज्या भाषेत बोलायचे आहे, त्या भाषेत हातात कागद न घेता कर्नाटक सरकारच्या कामगिरीबाबत जनतेत बोलावे. अन् या भाषणात फक्त ५ वेळा विश्वेश्वरय्या नाव घ्यावे असे आव्हानही त्यांनी दिले.

म्हैसूर येथील चामराजनगर येथील सभेला लोकांची मोठी गर्दी होती. मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात कन्नडमधून केली. हिंदीतून केलेल्या त्यांच्या भाषणाचे लगेचच कन्नडमध्ये भाषांतर करून सांगण्यात येत होते.

आजकाल असे लोक राजकारण करत आहेत की ना त्यांना देशाचा इतिहास माहीत नाही की वंदे मातरमची माहिती नाही, असे म्हणत राहुल गांधींना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी वंदे मातरम एका ओळीत संपवा असे म्हटले होते. त्याचा समाचार मोदींना घेतला. तुम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ऐकले नाही. किमान आपल्या आईचे तरी ऐका. तुमच्या आईने देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचे म्हटले होते. २०१४ पर्यंत तुमचेच सरकार होते. मग तुम्ही खोटे का बोलत आहात, असा सवाल उपस्थित केला.

काँग्रेसचे अध्यक्ष मला आव्हान देतात की, ते १५ मिनिटे बोलले तर मोदी बसू शकणार नाहीत. पण त्यांनी १५ मिनिटे बोलणे हीच मोठी गोष्ट आहे. तुम्ही नामदार आहात आम्ही तर कामदार आहोत. तुम्ही कोणत्याही भाषेत हातात कागद न घेता आपल्या सरकारविषयी बोलावे, असे आव्हानच त्यांनी दिले.

पराभवाला घाबरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या दोन मतदारसंघातून लढत आहेत. घराणेशाहीमुळे देशातील राजकारण खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारशी निगडीत प्रत्येक व्यक्तीच्या भ्रष्टाचाराचे वृत्त आले आहे. कर्नाटकात ना लॉ आहे ना ऑर्डर आहे, असा टोलाही लगावला.