पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एक ट्विट करत आपण विंग कमांडर अभिनंदनला घ्यायला वाघा सीमेवर जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा माझ्यासाठी सन्मान असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. माझ्यासाठी हा सन्मान असेल असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्यांनी हा ट्विट केला आहे.

अमरिंदर सिंग म्हणतात, प्रिय मोदीजी सध्या मी पंजाबच्या विविध भागांचा दौरा करतो आहे आणि अमृतसरमध्ये आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान वाघा बॉर्डर मार्गे भारतात पाठवणार आहे अशी माहिती मला समजली आहे. मी त्यांना घ्यायला जाणं हा माझ्यासाठी सन्मान ठरणार आहे, अभिनंदन आणि त्यांचे वडिल एनडीएचे विद्यार्थी आहेत आणि मीदेखील एनडीएचा विद्यार्थी आहे. त्यामुळे अभिनंदन यांना घ्यायला जाणं हा माझ्यासाठी सन्मान ठरेल असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

२६ फेब्रुवारीला बालाकोट या ठिकाणी भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. पंजाबच्या सीमाभागांमध्येही त्याचा परिणाम पाहण्यास मिळतो आहे. याच संदर्भात गुरूवारी अमरिंदर सिंह यांनी सीमाभागाचा दौरा केला. गुरूवारीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना आम्ही शुक्रवारी भारतात पाठवत असल्याचं स्पष्ट केलं आहे. ज्यानंतर अमरिंदर सिंग यांनी आपण त्यांना घ्यायला जाणं हे सन्मानाचं आहे असं म्हणत ट्विट केलं आहे.

अमरिंदर सिंग यांनी सीमा भागात असलेल्या गावांना भेटी दिल्या, खालरा या गावात जाऊन त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनाही भेट दिली आणि त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम केले. सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता माझ्या परिने जे सहकार्य करायचे आहे ते मी करेन असे आश्वासनही त्यांनी जवानांना दिले.

दरम्यान पाकिस्तानने बुधवारी सकाळी केलेला हवाई हल्ला परतवून लावताना वर्धमान यांनी पाकिस्तानच्या दोन एफ-१६ लढाऊ विमानांना खाली पाडले. यानंतर त्यांचे मिग-२१ विमान शत्रूने पाडल्यानंतर ते बाहेर पडले. त्यानंतर ते पाकिस्तानात आहेत. ‘शांततेचा संकेत’ म्हणून अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका केली जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी संसदेत जाहीर केले.