काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर त्यांच्या टि्वटर अकाऊंटच्या नावात बदल केला आहे. राहुल गांधी याआधी @OfficeOfRG या टि्वटर हँडल वरुन टि्वट करायचे पण आता @RahulGandhi हे त्यांचे नवीन टि्वटर हँडल आहे. सोशल मीडियावर अनेकांनी राहुल गांधींनी त्यांच्या टि्वटर हँडलमध्ये बदल करावा अशी मागणी केली होती. अखेर राहुल यांनी या मागणीची दखल घेत आपल्या टि्वटर हँडलमध्ये बदल केला आहे. मागच्या दीडवर्षांपासून राहुल गांधी टि्वटरवर मोठया प्रमाणात सक्रिय झाले आहेत.

प्रत्येक महत्वाच्या घटनेवर ते टि्वटरवरुन भाष्य करत असतात. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस पक्षाच्या आयटी सेलच्या सदस्यांशी बोलताना राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया रणनितीबद्दल चर्चा केली होती. टि्वटरचा जास्तीत जास्त वापर राजकीय मुद्दे, भूमिका मांडण्यासाठी करु असे राहुल यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

आपल्या टि्वटर हँडलवरुन ते भाजपा आणि नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने टीका करत असतात. गुजरात विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी अत्यंत हुशारीने आपल्या टि्वटर हँडलचा वापर करुन नरेंद्र मोदी आणि अमित शहांना लक्ष्य केले. त्यावेळी राहुल यांचे प्रत्येक टि्वट चर्चेचा विषय बनले होते.

दरम्यान आज काँग्रेसच्या ८४ व्या महाअधिवेशनाला राहुल गांधी यांनी प्रथमच पक्षाध्यक्ष म्हणून संबोधित केले. देशाला जोडण्याची ताकद तरुणांमध्ये असून काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.