नववर्षांच्या स्वागतासाठी परदेशात सुट्टीवर गेलेले राहुल गांधी मायदेशी परतताच सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी काँग्रेस कोअर गटाच्या बैठकीपुर्वी राहुल यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची भेट घेत अर्धा तास चर्चा केली. फेब्रुवारीअखेर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भ्रष्टाचारविरोधी सात प्रलंबित विधेयके मंजूर करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उमेदवार निवडीसाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली. युवा चेहऱ्यांना संधी देण्यावर शिक्कामोर्तब झाले असले ‘स्वच्छ व प्रामाणिक’ उमेदवारांचा शोध घेण्यासाठी काँग्रेसला विशेष लक्ष द्यावे लागणार आहेत. रेल्वे लाचखोरी प्रकरणात प्रारंभी हेकेखोर भूमिका घेणारे व नंतर राजीनामा देणारे माजी रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांचादेखील या समितीत समावेश करण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी पसरली आहे. निवड समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला. संभाव्य बंडखोरांवरही लक्ष ठेवा, असे राहुल यांनी या बैठकीत बजावल्याचे समजते.
अधिवेशनात व्हीसलब्लोअर्सना संरक्षण, न्यायीक सुधारणा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयक, नागरी सनद आदी विधेयकांवर कोअर गटाच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होते. विशेष म्हणजे केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल कोअर गटाचे सदस्य नसतानादेखील त्यांना बैठकीला बोलवण्यात आले होते.
भ्रष्टाचारविरोधी विधेयके मंजूर करण्यासाठी सर्वात मोठी भूमीका कायदा मंत्रालयाची राहणार असल्याने त्यांना बैठकीला पाचारण करण्यात आले होते.