नव्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये काढलेल्या शेतकरी बचाव रॅलीची केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी खिल्ली उडवली आहे. “राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात,” असं त्यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील भाजपा मुख्यालयात पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

“सत्तेत आल्यास कृषी कायदे रद्द करु” या राहुल गांधी यांच्या विधानावर बोलताना इराणी म्हणाल्या, “दलालांपासून छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची सुटका त्यांना नको आहे त्यामुळे त्यांचा या कायद्यांना पाठिंबा नाही. राहुल गांधींच सत्तेत येण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. संसदीय परंपरांचा आदर करण्याचा त्यांचा स्वभावचं नाही.”

दरम्यान, कृषी कायद्यांचे समर्थन करताना इराणी म्हणाल्या, नवे कायदे शेतकऱ्यांना त्यांचं पीक कोणालाही कोठेही योग्य किंमतीत विकण्याचा अधिकार देतात. मात्र, यातील दलाल संस्कृती कायम ठेवण्यासाठीच काँग्रेसचं राजकारण सुरु आहे.