आपल्या पुत्राने आपला राजकीय वारसा पुढे चालवावा अशी बहुसंख्य राजकीय नेत्यांची इच्छा असते, मात्र राजस्थानातील आमदार याला अपवाद ठरले आहेत. आपल्या पुत्राने त्याच्या पात्रतेनुसार आपला मार्ग निवडावा, असे या आमदाराचे म्हणणे आहे. भाजपचे आमदार हिरालाल वर्मा यांचा पुत्र हंसराज शुक्रवारी कृषी उपज मंडी येथे शिपाई पदासाठी मुलाखतीला आला होता.
हंसराज हा केवळ आठवी इयत्ताच शिकलेला असल्याने त्याने राजकारणात यावे आणि आपला वारसा चालवावा, अशी हिरालाल वर्मा यांची इच्छा नाही. तो शिपाई पदासाठी योग्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्यामुळेच हंसराज शुक्रवारी कृषी उपज मंडी येथे शिपाई पदाची मुलाखत देण्यासाठी गेला होता.
हिरालाल वर्मा हे टोंक जिल्ह्य़ातून सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते राज्य सरकारच्या सेवेत होते.  पुत्र शिकलेला नसल्याने त्याच्यासाठी शिपाई हेच काम योग्य आहे, त्याने आपल्या क्षमतेपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा मोठे काम करू नये, अशी हिरालाल वर्मा यांची इच्छा आहे. आपला पुत्र निवाई येथे एका खासगी क्लिनिकमध्ये काम करीत आहे. तो किमान शालान्त परीक्षाही उत्तीर्ण न झाल्याने त्याच्यासमोर केवळ शिपाई पद हाच पर्याय उपलब्ध आहे, असे वर्मा यांनी म्हटले आहे.