राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या चमूला पाकिस्तानला जाण्यासाठी नाकारण्यात आलेली परवानगी आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव यासह देशातील सुरक्षाविषयक परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी अधिकाऱ्यांनी देशातील सुरक्षेबाबतची अंतर्गत स्थिती आणि श्रीनगर एनआयटीतील तणाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केल्यानंतर एनआयटीतील वातावरण तणावाचे झाले होते.
पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात भारताच्या एनआयए चमूला पाकिस्तानला भेट देण्यास त्या देशाने नकार दिल्याच्या मुद्दय़ावरही या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली.
पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने पठाणकोटला भेट दिल्यानंतर पाकिस्तानही एनआयए चमूच्या दौऱ्यास परवानगी देईल, असे भारताला अपेक्षित होते.