रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केले आहे. याबद्दल कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एक निवेदन जारी केले आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत कंपनी कर्जमुक्त करण्याचे आश्वासन नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आल्याचे ते निवेदनाद्वारे म्हणाले.

“३१ मार्च २०२१ पर्यंत आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्त करू असे भागधारकांना केलेलं आश्वासन फार पूर्वी पूर्ण झालं आहे. हे जाहीर करून मला आनंद होत आहे,” असं मुकेश अंबानी यांनी निवेदन जारी करून म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली. तसंच हे ध्येय साध्य करण्यासाठी मुकेश अंबानींनी गेल्या काही दिवसांपासून गुतवणुकदार कंपनीशी जोडत होतो. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या एका कंपनीनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली होती. ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. रिलायन्स जिओच्या आतापर्यंत २४.७० टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीनं १.६ लाख कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे.

मार्च २०२० अखेर १,६१,०३५ कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या ५८ दिवसांत फेसबुकसारख्या १० परदेशी गुंतवणुकदारांना जिओ प्लॅटफॉममधील जवळपास २५ टक्के हिस्सा विकला आहे. यामुळे समूहावरील कर्ज पूर्णत: फेडलं जाणार आहे. तसंच रिलायन्सने हिस्सा विक्रीतून १,१५,६९३.९५ कोटी रुपये तर हक्कभाग विक्रीतून ५३,१२४.२० रुपये उभे केले आहेत.

अंबानी यांनी रिलायन्सच्या ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समुहावरील कर्ज मार्च २०२१ पर्यंत फेडण्याचे आश्वासन भागधारकांना दिले होते. मात्र १० महिन्यांतच ते फेडण्यात आले असून त्यासाठी प्रत्यक्ष निधी उभारणी अवघ्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण झाली आहे. १८ जून रोजी सौदी अरेबियातील कंपनीनं जिओमधील हिस्सा खरेदी केला होता.