सरकारकडून किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४.६२ टक्क्यांवर असलेल्या महागाई दरात वाढ झाली असून, नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर ५.५४ टक्क्यांवर पोहचला आहे. याचबरोबर औद्योगिक उत्पादनात घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर हा ऑक्टोबर महिन्यातील ४.६२ टक्क्यांपेक्षा जास्त, ५.५४ टक्के झाला आहे. जो की २०१६ नंतरचा सर्वात जास्त आहे व आरबीआयच्या ४ टक्क्यांच्या उद्दिष्टांपेक्षाही अधिक आहे. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर हा ४ टक्क्यांच्या आसपास राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र ज्याप्रकारे खाद्यपदार्थांच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे किरकोळ महागाई दराने आरबीआयची सीमा ओलांडली असल्याचे दिसत आहे.

खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. विशेषकरून कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात ४५.३ टक्के आणि ऑक्टोबरमध्ये १९.६ टक्के वाढ झाली होती. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ३.९९ टक्के होता.