ज्वारी, बाजरी, नाचणीचे उत्पादन मात्र वाढण्याचा अंदाज

नवी दिल्ली : २०१९-२०सालच्या खरीप हंगामात तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यामुळे, देशातील अन्नधान्याचे उत्पादन काहीसे कमी, म्हणजे १४०.५७ दशलक्ष टन होईल, असा अंदाज कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत व्यक्त करण्यात आला आहे.

२०१८-१९ सालच्या पीक वर्षांतील (जुलै ते जून) खरीप हंगामात देशातील अन्नधान्याचे उत्पादन १४१.७१ दशलक्ष टन होते. यंदा खरिपाच्या पिकांची लावणी जवळजवळ पूर्ण झाली असून त्यांची कापणी ऑक्टोबरपासून सुरू होईल.

उत्पादन आणि कापणी यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कृषी मंत्रालय चार अंदाज जारी करीत असते. पहिल्या अंदाजानुसार, २०१९-२० पीक वर्षांसाठी तांदळाचे उत्पादन १००.३५ दशलक्ष टन, म्हणजे यापूर्वीच्या वर्षांच्या १०२.३ दशलक्ष टनापेक्षा कमी होईल. डाळींचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ८.५९ ऐवजी यंदा कमी, म्हणजे ८.२३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.

ज्वारी, बाजरी, मका, नाचणी आदी  तृणधान्यांच्या उत्पादनात मात्र थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्यांचे उत्पादन ३२ दशलक्ष टन होईल असे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच हंगामात ३०.९९ दशलक्ष टन तृणधान्यांचे उत्पादन झाले होते.

कापूस, ताग आणि ऊस उत्पादन मात्र जवळपास गेल्या वर्षीइतकेच राहाणार आहे.

अतिवृष्टीचा फटका

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, बिहार आणि आसामात जोरदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती ओढवली होती. त्याचा फटका खरीप पिकांना बसला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट झाल्याचे सांगण्यात आले.