चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमूख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाकडून कोणता दिलासा मिळाला नाही. सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दुमका कोषागार प्रकरणी लालूंना दोषी ठरवले. सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले आहेत. दुसरीकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची मात्र सुटका करण्यात आली आहे. यावर आरजेडीचे नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्मक शब्दांत टीका केली आहे. अजब है नरेंद्र मोदी और नितीश का मेल, अजब है खेल. एक आदमी को जेल, एक आदमी को बेल, यही है नरेंद्र मोदी का खेल, असे टोला त्यांनी लगावला.

जगन्नाथ मिश्रा यांना निर्दोष सोडल्यामुळे रघुवंशप्रसाद सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली. अजब है नरेंद्र मोदी और नितीश का मेल, अजब है खेल, दुबारा से हो गया जगन्नाथ मिश्रा रिहा, और लालू यादव को जेल. एक आदमी को जेल, एक आदमी को बेल, यही है नरेंद्र मोदी का खेल, असे त्यांनी म्हटले.

लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत, ज्यापैकी तीन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आज दुमका कोषागार या चौथ्या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं. लालूप्रसाद यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बोगस पद्धतीने काढल्याचा आरोप आहे.

चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात लालूंना २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दुस-या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूंना दोषी ठरवत २३ डिसेंबर २०१७ रोजी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात न्यायालयाने २४ जानेवारी २०१८ ला लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालूप्रसाद यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.